August 14, 2026 1:42 PM

printer

स्वातंत्र्य दिनानिमित्त १ हजार ५७ कर्मचाऱ्यांना शौर्य आणि सेवा पदकं जाहीर

 स्वातंत्र्य दिनानिमित्त केंद्रीय गृह मंत्रालयाने पोलीस दल, अग्निशमन सेवा, होम गार्ड्स, नागरी संरक्षण आणि सुधार सेवा विभागातल्या एकूण ‘एक हजार ५७ कर्मचाऱ्यांना’ शौर्य आणि सेवा पदकं जाहीर केली आहेत. केंद्रीय गृह मंत्रालयानं आज एकूण ३०१ शौर्य पदकांची यादी जाहीर केली यात पोलीस दलातल्या २७२ पोलीस कर्मचारी आणि अग्निशमन सेवा विभागातल्या २९ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. जीव आणि मालमत्तेचं रक्षण करणं, गुन्हे रोखणं किंवा गुन्हेगारांना पकडणं यासाठी उल्लेखनीय धैर्य दाखवल्याबद्दल शौर्य पदक दिलं जातं. 

 

    तसंच एकूण ९२ राष्ट्रपती पदकं जाहीर करण्यात आली असून यामध्ये पोलीस सेवेसाठी ८३, अग्निशमन सेवेसाठी ४, नागरी संरक्षण आणि होमगार्ड सेवेसाठी ३ आणि सुधार सेवा विभागासाठी २ पदकांचा समावेश आहे. यासह ‘उत्कृष्ट सेवेसाठी’ एकूण ६६४ जणांना जाहीर करण्यात आली असून यात पोलीस दलातल्या सेवेसाठी ६०६, अग्निशमन सेवेसाठी २८, नागरी संरक्षण आणि होमगार्ड सेवेतल्या १८ आणि सुधार सेवा विभागातल्या १२ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. 

 

 पदकविजेत्यांमध्ये महाराष्ट्रातल्या ६० जणांचा समावेश आहे. यापैकी २० जणांना शौर्य पदकं, ३ जणांना उत्कृष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पदकं, ३७ जणांना ‘उत्कृष्ट सेवेसाठी’ पदकं जाहीर झाली आहेत.