November 29, 2024 7:39 PM

views 68

पुण्यामधल्या राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या १४७ तुकडीचा दीक्षांत संचलन सोहळा संपन्न

पुण्याजवळ खडकवासला इथल्या राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचा १४७ व्या तुकडीचा दीक्षान्त समारंभ आज झाला. लखनौ विद्यापीठाचे कुलगुरु आलोक कुमार राय प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यंदा ३५९ स्नातकाना पदवी प्रदान करण्यात आली.   यामध्ये विज्ञान शाखेचे ८३, संगणक विज्ञान ८६, कला शाखेचे ५८ तर बी टेक शाखेच्या १३२ छात्रांचा समावेश असून १९ परदेशी छात्र आहेत. उद्या सकाळी १४७ व्या तुकडीचं दीक्षांत संचलन होणार असून, हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल अमरप्रीत सिंग मानवंदना स्वीकारतील.

November 14, 2024 4:00 PM

views 59

म्हाडाच्या पुणे मंडळाच्या सदनिकांच्या विक्रीसाठी ऑनलाईन अर्ज भरण्यास मुदतवाढ

म्हाडाच्या पुणे मंडळाच्या ६ हजार २९४ सदनिकांच्या विक्रीसाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्याची मुदत १० डिसेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. ही संगणकीय सोडत असून यात पुणे, पिंपरी चिंचवड तसंच सोलापूर, कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातल्या विविध गृहनिर्माण योजनांमधल्या सदनिकांचा समावेश आहे. पुढच्या वर्षी ७ जानेवारी रोजी सकाळी दहा वाजता ही सोडत काढली जाईल.

November 12, 2024 8:07 PM

views 40

राज्यात परकीय गुंतवणुकीचा पुण्याला फायदा – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

गेल्या काही वर्षात राज्यात परकीय गुंतवणुकीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून याचा फायदा पुण्याला झाल्याचं प्रधानमंत्री पुण्यात झालेल्या प्रचारसभेत म्हणाले. परकीय कंपन्यांची पसंती महाराष्ट्राला सर्वाधिक आहे, आयटी आणि इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रात गुंतवणूक वाढल्यावर पुण्यात कंपन्यांची संख्या वाढली. त्यामुळे तरुणांना रोजगाराची संधी निर्माण झाली असं मोदी यांनी सांगितलं. 

November 5, 2024 7:05 PM

views 64

दौंड विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारीपदावर उपजिल्हाधिकारी गणेश मरकड यांची नियुक्ती

पुणे जिल्ह्यातल्या दौंड विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारीपदावर प्रांताधिकारी मिनाज मुल्ला यांच्याऐवजी उपजिल्हाधिकारी गणेश मरकड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. निवडणुकीतील अपक्ष उमेदवारांचे अर्ज स्वीकारण्यापूर्वी त्यांच्याशी पक्षपातीपणाने वागणे, निवडणूक लढविण्यापासून वंचित ठेवून शासनाचा महसूल बुडवणे अशा तक्रारी निवडणूक आयोगाकडे दाखल झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. 

October 24, 2024 7:32 PM

views 87

पुणे कसोटीत पहिल्याच दिवशी न्यूझीलंडचा संघ २५९ धावात गारद / दिवसअखेर भारताच्या १ बाद १६ धावा

न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या आजच्या पहिल्या दिवसअखेर भारतानं १ बाद १६ धावा केल्या. कर्णधार रोहित शर्मा लवकर बाद झाला. शुभमन गिल १० आणि यशस्वी जयस्वाल ६ धावांवर खेळत होते. त्यापू्र्वी न्यूझीलंडच्या संघाने सर्वबाद २५९ धावा केल्या. न्यूझीलंडकडून डेव्हन कॉनवेने ७६ तर रचिन रवींद्रने ६५ धावांची खेळी केली. भारताकडून वॉशिंग्टन सुंदरने ५ तर रविचंद्रन अश्विनने ३ गडी बाद केले. तीन सामन्यांच्या मालिकेत न्यूझीलंडनं बंगळुरू इथला पहिला कसोटी सामना जिंकला आहे.

October 21, 2024 3:21 PM

views 57

पुण्यात महात्मा फुले मंडई परिसरातील मेट्रोस्थानकात आग

पुण्यातल्या महात्मा फुले मंडई परिसरातल्या मेट्रोस्थानकात मध्यरात्रीच्या सुमारास आग लागली. मेट्रोस्थानकात तळमजल्यावर वेल्डिंगचे काम सुरु असताना तिथे ठेवलेल्या फोमच्या साहित्याने पेट घेतला असा प्राथमिक अंदाज आहे. या आगीत कोणीही जखमी झालं नाही. या घटनेचा मेट्रो सेवेवर कोणताही परिणाम होणार नसल्याचं पुणे मेट्रो प्रशासनाकडून कळवण्यात आले आहे.

October 17, 2024 7:26 PM

views 53

राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुण्यातल्या ६०० पदाधिकाऱ्यांचा सामूहिक राजीनामा

राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुण्यातल्या ६०० पदाधिकाऱ्यांनी नुकताच सामूहिक राजीनामा दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुण्याचे शहराध्यक्ष दीपक मानकर यांना विधानपरिषदेच्या राज्यपाल नियुक्त आमदारांमध्ये संधी न दिल्यामुळे कार्यकर्ते नाराज झाले असून त्यामुळे पुणे शहर पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामा दिल्याचं सांगण्यात येत आहे.

October 11, 2024 3:32 PM

views 45

पुण्यातल्या खेड तालुक्यातल्या टेकवडी गावानं पटकावला राज्यातलं दुसरं सौरग्राम होण्याचा मान

राज्यातले दुसरे सौरग्राम होण्याचा मान पुणे जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातल्या टेकवडी गावानं पटकावला आहे. १ हजार २३९ लोकसंख्येच्या या गावातील सर्वच घरगुतीसह ७४ वीज जोडण्यांना सौर ऊर्जा प्रकल्पांतून वीजपुरवठा सुरु झाला आहे. महावितरणकडून राज्यातील १०० गावे १०० टक्के सौर ऊर्जेवर नेण्याची मोहीम सुरू असून त्यात टेकवडी गावाची निवड झाली होती. यात सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातल्या मान्याची वाडीनं प्रथम क्रमांक मिळवला होता.

October 2, 2024 1:35 PM

views 49

पुण्यात बावधन इथं हेलिकॉप्टर दुर्घटनेत तीन जणांचा मृत्यू

पुण्यातल्या बावधन इथे आज सकाळी हेलिकॉप्टर कोसळून झालेल्या दुर्घटनेत तीन जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये दोन वैमानिक आणि एका अभियंत्याचा समावेश आहे. बावधन परिसरात आज सकाळी पावणे सात वाजता ही दुर्घटना घडली. परिसरातल्या घटनास्थळी पुणे महानगरपालिका, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण तसंच अग्निशमन दलाकडून बचावकार्य करण्यात आलं.

September 26, 2024 2:09 PM

views 63

मुसळधार पावसाच्या शक्यतेमुळे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा पुणे दौरा रद्द

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा आजचा नियोजित पुणे दौरा रद्द झाला आहे. मुसळधार पावसाच्या शक्यतेमुळे हा दौरा रद्द झाल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. राज्यातल्या २२ हजार ६०० कोटी रुपयांहून अधिक रकमेच्या विविध प्रकल्पांचं भूमिपूजन आणि लोकार्पण आज प्रधानमंत्र्यांच्या हस्ते होणार होतं.