राम मंदिर देणगी अपहार प्रकरण आणि आंदोलक विद्यार्थ्यांवर पोलिसांच्या कारवाईच्या मुद्द्यावरून विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे आज संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज सोमवारपर्यंत तहकूब करण्यात आलं. लोकसभेत सकाळी ११ वाजता कामकाजाला सुरुवात झाली तेव्हा सभापती ओम बिरला यांनी येत्या ९ तारखेला भारत छोडो आंदोलनाच्या चौऱ्याऐंशीव्या वर्धापन दिनाचा उल्लेख केला. देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांना सभागृहातल्या उपस्थितांनी दोन मिनिटं मौन पाळून श्रद्धांजली वाहिली.
त्यानंतर बिरला यांनी प्रश्नोत्तराचा तास पुकारला. तेव्हा विरोधी पक्ष सदस्यांनी राम मंदिर देणगी अपहार आणि आंदोलक विद्यार्थ्यांवरच्या पोलिसांच्या कारवाईवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी निवेदन द्यावं या मागणीवरून घोषणाबाजी सुरू केली. त्यावर सभागृहाचं कामकाज सुरू ठेवण्याचं आवाहन बिरला यांनी केलं. मात्र, गदारोळ सुरूच राहिल्यानं त्यांनी सभागृहाचं कामकाज आधी दुपारी १२ आणि नंतर सोमवारपर्यंत तहकूब केलं.
याच मुद्द्यावरून राज्यसभेत झालेल्या गदारोळामुळे राज्यसभेचं कामकाजही सोमवारपर्यंत तहकूब झालं. सकाळी ११ वाजता कामकाजाला सुरुवात झाली तेव्हा अध्यक्ष सी.पी. राधाकृष्णन यांनी भारत छोडो आंदोलनाच्या चौऱ्याऐंशीव्या वर्धापनदिनाविषयी सांगत स्वातंत्र्य लढ्यातल्या हुतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण केली. सभागृहातल्या उपस्थितांनीही राष्ट्रपिता महात्मा गांधी तसंच भारताच्या स्वातंत्र्यासाठी सर्वोच्च बलिदान देणारे स्वातंत्र्यसैनिक आणि हुतात्मे यांना दोन मिनिटं मौन पाळून श्रद्धांजली वाहिली.
यानंतर संरक्षण, गृह मंत्रालय, वाणिज्य, आरोग्य आणि कुटुंब कल्याण या विभागांशी संबंधित संसदीय स्थायी समित्यांचे अहवाल सभागृहात सादर करण्यात आले. त्यानंतर, विरोधकांच्या गदारोळातच अध्यक्षांनी शून्य प्रहराची घोषणा केली. मात्र, गदारोळ सुरूच राहिल्यानं कामकाज आधी दुपारी १२ आणि नंतर सोमवारपर्यंत तहकूब झालं.