२०२४-२५ या वर्षातल्या कामगिरीसाठीचे संगीत नाटक अकादमी पुरस्कार आज नवी दिल्लीत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. राज्यातल्या १० कलावंतांचा पुरस्कार विजेत्यांमधे समावेश आहे.
ज्येष्ठ गायक अरुण कशाळकर यांना ३ लाख रुपयांची गौरववृत्ती प्रदान करण्यात आली. गायक आनंद भाटे, मुकुंद मराठे, सनईवादक शैलेश भागवत, नृत्यांगना शुभदा वरदकर, मनीषा साठे, संगीतकार अशोक पत्की, नृत्यदिग्दर्शक सुभाष नकाशे, अभिनेता अरुण नलावडे आणि दिग्दर्शक प्रमोद पवार यांना प्रत्येकी एक लाख रुपये,ताम्रपट, आणि शाल श्रीफळ देऊन राष्ट्रपतींनी त्यांचा सन्मान केला.
त्याखेरीज राज्यातले गायक कृष्णा बोंगाणे, अंकिता जोशी, भारूड गायक भावार्थ देखणे, कठपुतळी कलावंत बालकृष्ण मासगे, संवादिनीवादक तन्मय देवचके, आणि जागर कलावंत प्रवीण जाधव यांना युवा कलावंतांसाठीचे उस्ताद बिस्मिल्लाखाँ युवा पुरस्कार प्रदान करण्यात आले. २५ हजार रुपये, मानपत्र आणि शाल श्रीफळ असं पुरस्काराचं स्वरुप आहे.
संगीत, नृत्य, नाटक, लोककला, आदिवासी कला, पपेट्री आणि नाट्यविषयक इतर कला प्रकारांमधे भरीव योगदान देणाऱ्या देशभरातल्या एकूण २५४ कलावंतांचा आजच्या कार्यक्रमात गौरव करण्यात आला.