बारावा राष्ट्रीय हातमाग दिवस आज देशभरात साजरा होत आहे. ७ ऑगस्ट १९०५ रोजी भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा एक भाग म्हणून स्वदेशी चळवळ सुरू करण्यात आली. त्याची आठवण म्हणून दरवर्षी हा दिवस राष्ट्रीय हातमाग दिवस म्हणून साजरा होतो. या निमित्ताने वस्त्रोद्योग मंत्रालयाने राष्ट्रपती भवनात आज विशेष कार्यक्रम आयोजित केला होता.
या कार्यक्रमात देशभरातल्या २२ हातमाग कारागीरांना संत कबीर हातमाग पुरस्कार आणि राष्ट्रीय हातमाग पुरस्कार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. २०२५ या वर्षाचा संत कबीर पुरस्कार ओडिशाच्या राम मेहेर, आसामच्या रुणिमा चौधरी, उत्तर प्रदेशचे शाह मोहम्मद अन्सारी यांना प्रदान करण्यात आला. हातमागाची वीण भारताचा स्वातंत्र्यलढा आणि आत्मनिर्भरतेचा दृष्टिकोनाशी घट्ट जुळलेली असून हे क्षेत्र भारताची असामान्य विविधता दर्शवतं असंही राष्ट्रपती यावेळी म्हणाल्या.
देशातल्या समृद्ध आणि वैविध्यपूर्ण हातमाग विणकाम परंपरांचं स्मरण करून देणारी चार विशेष टपाल तिकिटंही या प्रसंगी जारी करण्यात आली.