संसदेच्या दोन्ही सभागृहांंचं कामकाज सोमवारपर्यंत तहकूब

 विद्यार्थी आंदोलनादरम्यान पोलीस कारवाईसह विविध मुद्द्यांवरून विरोधकांनी घोषणाबाजी केल्यामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांंचं कामकाज सोमवारपर्यंत तहकूब करण्यात आलं. 

त्यापूर्वी गोंधळातच लोकसभेत जन्म – मृत्यू नोंदणी सुधारणा विधेयक मंजूर करण्यात आलं. जन्म आणि मृत्यूच्या एक वर्षानंतर आणि २ वर्ष कालावधी पूर्वी नोंदणी करायची असेल तर याअंतर्गत जिल्हाधिकाऱ्यांची मंजुरी लागेल. जन्म-मृत्यू नंतर २ वर्षांनी नोंदणी केली तर प्रथम वर्ग न्याय दंडाधिकाऱ्यांची परवानगी आवश्यक असेल. या विधेयकावर चर्चा करावी असं सरकारचं आवाहन विरोधकांनी फेटाळून लावलं आणि गदारोळ सुरूच ठेवल्यानं त्यातच हे विधेयक मंजूर झालं. 

लोकसभेतले विरोधी पक्ष नेता राहुल गांधी यांच्याविरुद्ध भाजपाचे अनुराग ठाकूर यांनी हक्कभंग प्रस्तावाची नोटीस दिली आहे. पेपरफुटीविरोधी विधेयकावर चर्चेदरम्यान गांधी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर खोटे आरोप केल्याचं सांगत  गांधी यांच्यावर योग्य ती कारवाई करण्याची मागणी त्यांनी सभापतींकडे केली आहे.

राम मंदिर देणगी अपहार प्रकरणी काँग्रेस आणि समाजवादी पक्षाच्या खासदारांनी संसद भवन परिसरात आंदोलन केलं. MPSC तसंच MHCET परीक्षेत घोटाळा झाल्याचा आरोप करत महाराष्ट्रातल्या काँग्रेस खासदारांनी आज संसद भवन परिसरात निदर्शनं केली. झारखंड राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत पेपर फुटी प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी करत भाजपा खासदारांनी आंदोलन केलं.