कोरिया बॅडमिंटन मास्टर्स स्पर्धेत आज भारताच्या रक्षिता रामराज आणि अश्मिता चालिहा यांनी महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत धडक मारली आहे. उपांत्यपूर्व फेरीत रक्षिताने आपलीच सहकारी तन्वी शर्माचा २१-१८, १९-२१, १९-२१ असा पराभव केला. आता उपांत्य फेरीत तिचा सामना आणखी एक भारतीय खेळाडू अश्मिता चालिहा हिच्याशी होईल.
अश्मिताने अव्वल मानांकित हिना अकेचीचा २०-२२, २१-१५, २१-१९ असा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला. त्यानंतर आजच्याच सत्रात, पुरुष दुहेरीत पृथ्वी कृष्णमूर्ती रॉय आणि कृष्ण प्रसाद गरग यांची जोडी उपांत्य फेरीतील स्थानासाठी मलेशियाच्या मॅन वेई चोंग आणि सोह वूई यिक या जोडीशी भिडणार आहे. दरम्यान, कोरिया मास्टर्स स्पर्धेत महिला दुहेरी आणि मिश्र दुहेरी प्रकारांमधील भारताचं आव्हान संपुष्टात आलं.
महिला दुहेरीत सोनाली सिंग आणि रितिका ठाकर यांना सातव्या मानांकित जपानी जोडी सुमिरे नाकादे आणि मियू ताकाहाशी यांच्याकडून २१-१५, २१-९ असा पराभव पत्करावा लागला आणि त्या स्पर्धेतून बाहेर गेल्या आहेत. मिश्र दुहेरीत, सहाव्या मानांकित इशान भटनागर आणि श्रुती मिश्रा यांना दक्षिण कोरियाच्या शिन ते-यांग आणि किम यू जुंग यांच्याकडून २१-१६, १६-२१, २१-१३ असा पराभव स्वीकारावा लागला.