देशाच्या काही राज्यांमध्ये मुसळधार पावसाने कहर केला असून, आसाममध्ये पूरपरिस्थिती गंभीर झाली आहे. चौदा जिल्ह्यांमधल्या सुमारे १ लाख ६० हजार नागरिकांना पुराचा फटका बसला आहे. पुरामुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या ९५ वर पोचली आहे. पूराचा सर्वाधिक फटका बसलेल्या शिवसागर जिल्ह्यात ५० जणांचा बळी गेला. तर चराईदेव जिल्ह्यात २१ जण दगावले. आसामच्या सहा जिल्ह्यांमध्ये सरकारने एकूण १०० मदत केंद्रं सुरू केली आहेत. इतर जिल्ह्यातल्या बांधबंधारे, रस्ते, पूल आणि इतर पायाभूत सुविधांचंही पुरामुळे नुकसान झालं आहे. १६ हजार ९५१ हेक्टरहून जास्त शेतजमीन पाण्याखाली गेली आहे.
आसाममधल्या पूरपरिस्थितीचा काल केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा यांनी आढावा घेतला. मुख्यमंत्री हिमंता बिस्व सरमा यांच्या बरोबर झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत त्यांनी पूरग्रस्तांचा बचाव, पुनर्वसन आणि पूरग्रस्त भागात रोगराई वाढू नये यासाठीच्या उपाययोजना करण्याचे निर्देश दिले.
ओदिशात पूरपरिस्थिती आटोक्यात येत आहे. महानदीसह अनेक नद्यांची पाणीपातळी सर्वसाधारण होत आहे. मात्र जोरदार पावसामुळे भुवनेश्वर जलमय झालं आहे. हवामान विभागाने पुन्हा जोरदार पावसाचा इशारा दिला असल्याने आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे.
उतराखंडमध्येही डेहराडून, चमोली आणि बागेश्वर या जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने आज मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. उत्तराखंड सरकारने आज शाळा तसंच अंगणवाडी केंद्रांना सुटी जाहीर केली आहे. जिल्हा आपत्कालीन केंद्रं चोवीस तास सुरु ठेवण्याचे आदेश मुख्यमंत्री पुष्करसिंग धामी यांनी दिले आहेत.