यवतमाळच्या दारव्हा तालुक्यात कुपटी नदीत वाहून गेलेल्या कारमधील तीन जणांचे मृतदेह बचाव पथकाच्या हाती लागले आहेत. लोणी इथलं रहिवासी असलेलं हे कुटुंब कार घेऊन राळेगाव इथून गावी परतत असताना त्यांची गाडी पुराच्या पाण्यात वाहून गेली होती.
धुळे तालुक्यात आंबोडे इथं दोन जण पुरात वाहून गेले आहेत. मुकटी गावात लक्ष्मीनगर इथे पुराच्या पाण्यात अडकलेल्यांना मुकटी ग्रामस्थांनी बाहेर काढलं.
नंदुरबार जिल्ह्यात काल मध्यरात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धडगाव तालुक्यात चंदसैली घाटात दरड कोसळली असून हा मार्ग पूर्णपणे बंद झाला आहे.
नाशिक घाटमाथा परिसरात तसंच, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, सुरगाणा आणि कळवण या चार तालुक्यात काल रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. सोलापूर जिल्ह्यात संततधार पावसामुळे भीमा आणि नीरा नदीपात्रात पाण्याची आवक वाढली आहे. त्यामुळे उजनी धरणातून सुमारे ८० हजार क्युसेक तर वीर धरणातून ३३ हजारांपेक्षा जास्त क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. या पार्श्वभूमीवर नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.