भिवंडी इथं इमारत कोसळून ९ जणांचा मृत्यू

ठाणे जिल्ह्यात भिवंडी इथं काल रात्री कोहिनूर ही चार मजल्यांची इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत नऊ जणांचा मृत्यू झाला. इमारतीच्या ढिगाऱ्याखाली काही लोक अडकले असून त्यांना वाचवण्याचं काम  युद्धपातळीवर सुरू आहे.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं असून मृतांच्या वारसांना प्रधानमंत्री राष्ट्रीय मदत निधीतून प्रत्येकी २ लाख रुपये आणि जखमींना ५० हजार रुपयांची  मदत जाहीर केली आहे. राज्य शासनाने मृतांच्या कुटुंबियांना पाच लाख रूपयांची मदत जाहीर केली आहे. 

 या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी असल्याचं  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. या प्रकरणात तत्काळ गुन्हा दाखल करून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आदेश महापालिका आयुक्तांना दिल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. जखमींवर योग्य ते उपचार करण्याच्या सूचना भिवंडी मनपा आयुक्त आणि ठाण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिल्याचं उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितलं. आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

दरम्यान, इमारत पडली त्या ठिकाणी  NDRF, भिवंडी अग्निशमन दल आणि स्थानिक प्रशासनाच्या पथकांकडून युद्धपातळीवर मदत आणि बचावकार्य सुरू आहे. आतापर्यंत नऊ मृतदेह ढिगाऱ्याखालून काढले असून त्यातल्या तिघांची ओळख अद्याप पटलेली नाही.