देशभरात उद्यापासून जागतिक स्तनपान सप्ताह २०२६ साजरा करण्यात येणार

देशभरात उद्यापासून जागतिक स्तनपान सप्ताह २०२६ साजरा करणार येणार आहे. महिला आणि बालविकास मंत्रालयाच्या या आठवडाभर चालणाऱ्या मोहिमेचा उद्देश कुटुंबं, विविध समुदाय आणि आरोग्य सेवा पुरवठादारांमध्ये स्तनपानाविषयी तसंच पूरक आहाराच्या महत्त्वाविषयी जागरुकता निर्माण करणं हा आहे. प्रत्येक नवजात अर्भकाच्या जन्मानंतर पहिल्या तासाभरात त्याला स्तनपान करता येईल, हे सुनिश्चित करावं असं आवाहन मंत्रालयाने केलं आहे. पहिल्या सहा महिन्यांत बाळाला फक्त आईचं दूध मिळणं अत्यावश्यक आहे. पाणी, मध, ग्लुकोज किंवा तत्सम कुठलेही द्रव पदार्थ पाजू नयेत. सहा महिन्यांनंतर पुढची दोन वर्षं आणि त्यापुढेही स्तनपान सुरू ठेवून पौष्टीक आहार सुरू करावा. स्तन्यदा मातांनाही प्रसुतीनंतर झालेली शारीरिक झीज भरून यायला मदत होते. तसंच स्तनांचा आणि अंडाशयाचा कर्करोग, टाईप टू प्रकारचा मधुमेह आणि प्रसुतीनंतरच्या नैराश्याची जोखीमही कमी होते, असं मंत्रालयाने म्हटलं आहे.