एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला खरी शिवसेना म्हणून मान्यता देण्याच्या, तसंच पक्षाचं धनुष्यबाण हे चिन्ह शिंदे यांच्या गटाला देण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. ज्येष्ठ विधीज्ञ कपिल सिबल यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्य कांत, न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची आणि न्यायमूर्ती व्ही. मोहना यांच्या पीठासमोर युक्तिवाद केला.
ज्या मुद्द्यावर पक्षाची स्थापन झाली, तो मुद्दा सोडून पक्षाच्या नेत्यांनी इतर पक्षांशी युती केली. त्याचंच फळ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मिळालं आहे, असं मत शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या बाहेर वार्ताहरांशी बोलताना मांडलं. तर अस्तित्वच नसलेल्या एका व्यक्तीला एखाद्या पक्षाचं मूळ चिन्ह कसं देता येईल, यावर आज न्यायालयात कपिल सिब्बल यांनी केलेला युक्तिवाद म्हणजे पक्षांतरबंदी कायद्याची चीरफाड करणाऱ्यांना मोठा धडा असल्याचं प्रतिपादन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी केलं.