शिवसेना विधिमंडळ पक्षात पडलेली फूट ही पक्षसंघटनेपर्यंत आणि प्राथमिक सदस्यत्वापर्यंत पोहोचते का, हे आधी तपासावं लागेल, असं मत सर्वोच्च न्यायालयानं आज नोंदवलं.
एकनाथ शिंदे गटाला खरी शिवसेना मानून पक्षाचं धनुष्यबाण हे चिन्ह शिंदे गटाला देण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या याचिकेवर सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्य कांत, न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची आणि न्यायमूर्ती व्ही. मोहना यांच्या पीठासमोर सुनावणी झाली.
विधिमंडळ पक्षात फूट पडली, याचा अर्थ राजकीय पक्षात फूट पडली, असा होत नाही, असा युक्तिवाद शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे वकील कपिल सिबल यांनी केला. पक्षात फूट पडली आहे का, हे आधी तपासायला हवं. फुटीची सुरुवात विधिमंडळ पक्षापासून होऊ शकते, आणि ही फूट वाढत जाऊन पुढे पक्ष संघटना आणि प्राथमिक सदस्यत्वापर्यंत पोहोचू शकते, असं मत न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची यांनी नोंदवलं. या प्रकरणाची पुढची सुनावणी उद्या होणार आहे.