August 5, 2026 1:52 PM

printer

विद्यार्थी आंदोलनावर पोलिसांच्या कारवाईसह विविध मुद्द्यांवरून गदारोळ झाल्यामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज दुपारी २ वाजेपर्यंत तहकूब

जंतरमंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलिसांच्या कारवाईसह विविध मुद्द्यांवरून विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे आज संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज दुपारी २ वाजेपर्यंत तहकूब झालं. सकाळी ११ वाजता लोकसभेचं कामकाज सुरू झालं तेव्हा सभापती ओम बिरला यांनी प्रश्नोत्तराचा तास घेण्याचा प्रयत्न केला. मात्र आंदोलक विद्यार्थ्यांवरच्या पोलिसांच्या कारवाईवर गृहमंत्री अमित शहा यांनी निवेदन द्यावं अशी मागणी विरोधी पक्ष सदस्यांनी केली. त्यावर प्रश्नोत्तराच्या तासात प्रत्येक सदस्याला जनहिताचे मुद्दे मांडता येतात, त्यामुळे हा तास सुरू ठेवण्याचं आवाहन बिरला यांनी विरोधकांना केलं. मात्र, गदारोळ सुरूच राहिल्यानं लोकसभेचं कामकाज दुपारी २ वाजेपर्यंत तहकूब झालं. 
याच मुद्द्यावरून आज राज्यसभेचं कामकाजही २ वाजेपर्यंत तहकूब झालं. सकाळी ११ वाजता कामकाजाला सुरुवात झाली तेव्हा अध्यक्ष सी. पी. राधाकृष्णन यांनी शून्य प्रहराची घोषणा केली. कलम ३७० रद्द केल्याला आज सात वर्षं पूर्ण झाल्याची आठवण जम्मू काश्मीरचे भाजप खासदार सत पॉल शर्मा यांनी जागवली. हा दिवस केवळ जम्मू-काश्मीरच नव्हे तर संपूर्ण देशाच्या इतिहासातला एक ऐतिहासिक दिवस असल्याचं ते म्हणाले. तर हरयाणाचे खासदार संजय भाटिया यांनी हायड्रोजन रेल्वे सुरू केल्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदींचे आभार मानले. या दरम्यान, विरोधकांनी गदारोळ सुरू केल्यामुळे अध्यक्षांनी कामकाज आधी १२ आणि नंतर २ वाजेपर्यंत तहकूब केलं. 
सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.