जंतरमंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलिसांच्या कारवाईसह विविध मुद्द्यांवरून विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे आजही संसदेत गदारोळ झाला आणि वारंवार कामकाज तहकूब झालं.
विरोधकांच्या गदारोळातच लोकसभेत विनियोजन विधेयक लोकसभेत मंजूर झालं आणि त्यानंतर लोकसभेचं कामकाज उद्यापर्यंत तहकूब झालं.
राज्यसभेत सकाळी ११ वाजता कामकाजाला सुरुवात झाल्यानंतर गृहनिर्माण आणि नगरविकास विभागाशी संबंधित संसदीय स्थायी समितीचा अहवाल सभागृहात सादर करण्यात आला. त्यानंतर विरोधकांच्या घोषणा सुरू असतानाच अध्यक्ष सी. पी. राधाकृष्णन यांनी शून्य प्रहर पुकारला. त्यानंतर विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी राम मंदिर देणगी अपहार प्रकरणाचा मुद्दा उपस्थित केला. त्याला संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी प्रत्युत्तर दिलं. राम मंदिराला विरोध करणारे आता देणगीत अपहार झाल्याचं सांगून नक्राश्रू ढाळत देशाची दिशाभूल करत असल्याची टीका रिजिजू यांनी केली. मात्र, अमित शहा यांच्या निवेदनाची मागणी करणाऱ्या विरोधकांनी हौद्यात उतरून घोषणाबाजी सुरू केली. गदारोळ सुरूच राहिल्यामुळे कामकाज आधी १२ आणि नंतर २ वाजेपर्यंत तहकूब झालं होतं. त्यानंतर राज्यसभेत जन्म मृत्यू नोंदणी संदर्भातल्या विधेयकावर चर्चा झाली आणि गोंधळातच हे विधेयक मंजूर झालं. त्यानंतर राज्यसभेचं कामकाजही दिवसभरासाठी तहकूब झालं.