August 5, 2026 8:26 PM

printer

RBI पतधोरण: व्याजदर ‘जैसे थे’; कर्जदरात पारदर्शकतेसाठी नियमांत सुधारणा

मजबूत मागणीच्या पाठबळावर भारतीय अर्थव्यवस्था  जगात सर्वाधिक वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था हे भारताचं स्थान कायम राहीलं असल्याचं रिझर्व बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी सांगितलं. रिझर्वबँकेच्या पत आणि वित्त धोरण द्वैमासिक आढावा बैठकीनंतर ते वार्ताहरांशी बोलत होते. 

व्याजदर जैसे थे ठेवण्याचा निर्णय या बैठकीत झाला. त्यामुळे रेपो दर सव्वा ५ टक्क्यांवर कायम राहील आणि इतरही दर पूर्वीप्रमाणेच  राहतील.  गेल्यावेळेच्या तुलनेत आर्थिक वृद्धीदराचा अंदाज १ दशांश टक्क्यांनी वाढवून ६ पूर्णांक ७ दशांश टक्के केला आहे.तर किरकोळ किमतीवर आधारित महागाई दराचा अंदाज  ५ पूर्णांक १ दशांश टक्क्यांवरुन ५ टक्के केला आहे. 

कर्जावरच्या व्याजदरांमध्ये पारदर्शकता राहण्यासाठी नियमांमधे  सुधारणा करण्याचा मानस मल्होत्रा यांनी व्यक्त केला. सहकारी बँकांचे परवाने पुन्हा खुले करण्यासाठी दिशानिर्देशांचा मसुदा रिझर्व्ह बँक जाहीर करणार आहे. तसंच ग्रामीण सहकारी बँकांच्या कर्जांवर लक्ष ठेवण्यासाठीच्या सुधारित नियमावलीचा मसुदाही बँकेकडून प्रसिद्ध केला जाणार आहे. 

पश्चिम आशियात संघर्ष पुन्हा सुरु होणं चिंताजनक असल्याचं मल्होत्रा म्हणाले. जागतिक पुरवठा साखळीत अडथळे निर्माण होत असून बाजारात अस्थिरता निर्माण झाली असल्याचं ते म्हणाले. त्यातच अमेरिकेनं पुन्हा अतिरिक्त आयात शुल्क लादल्यानं परिस्थिती बिकट झाल्याचं त्यांनी सांगितलं. 

एल निनोचं सावट,  भू-राजकीय संघर्ष यामुळे खाद्यपदार्थ, इंधन आणि इतर वस्तूंच्या किंमती वाढून पुन्हा महागाईचा धोका असल्याचा इशाराही रिझर्व्ह बँकेनं दिला आहे. 

१० आणि २० रुपयांच्या प्लास्टिकच्या नोटा पुढच्या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला चलनात येण्याची शक्यता रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी व्यक्त केली आहे. या नोटांच्या चाचणीसाठी रिझर्व्ह बँकेने तयारी सुरू केली आहे. ही चाचणी यशस्वी झाली तर या नोटा चलनात येऊ शकतील.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.