July 31, 2026 8:57 PM

printer

पाकव्याप्त काश्मीरमधे पाकिस्तान निरपराध जनतेवर अत्याचार करत असून भारतानं पाकिस्तानचा तीव्र निषेध केला.

पाकव्याप्त काश्मीरमधे पाकिस्तान निरपराध जनतेवर अत्याचार करत असून जगानं याची दखल घ्यावी आणि पाकिस्तानला जाब विचारावा असं आवाहन भारतानं केलं आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी आज नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत सांगितलं की पाकिस्तान अत्याचारांमुळे पाकव्याप्त काश्मीरमधे ४० हून जास्त लोकांचा बळी गेला आहे. भारतावर हल्ले करण्यासाठी प्रशिक्षित केलेल्या मुजाहीदीनच्या बंदुका आता पाकिस्तानवर उलटल्या असल्याचं पाकिस्तानी प्रधानमंत्र्यांच्या विशेष सहाय्यकांनी जाहीरपणे कबूल केलं असल्याची माहिती जयस्वाल यांनी दिली. 

रशियन सैन्यातल्या १३९ भारतीय जवानांच्या सुटकेसाठी प्रयत्न सुरु असल्याचं ते म्हणाले. परदेशी नोकरीचा प्रस्ताव स्वीकारताना सावधगिरी बाळगावी असा इशारा त्यांनी दिला. एजीव्ही रॅग्नर बोटीवरुन  बेपत्ता झालेल्या दोन भारतीय कर्मचाऱ्यांचा शोध घेण्यासाठी सरकार युक्रेन आणि रुमानियाच्या संपर्कात आहे असं त्यांनी सांगितलं. यंदाच्या वर्षात आतापर्यंत बाराशे साठ भारतीयांना अमेरिकेने तडीपार केलं असल्याची माहिती त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात दिली. गेल्या वर्षी ही संख्या तीन हजार ५६७ होती असं ते म्हणाले.