गडचिरोली जिल्ह्यात जापतलाई इथल्या आदिवासी आश्रम शाळेत सर्पदंशामुळे तीन मुलींचा मृत्यू झाल्याप्रकरणी या शाळेचा परवाना कायमस्वरुपी रद्द करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी आज दिले. रविवारी रात्री झालेल्या या दुर्घटनेबाबत आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी मंत्रिमंडळ बैठकीत सविस्तर माहिती दिली.
याप्रश्नी एक बैठक बोलावून आश्रमशाळांसाठी एक सर्वंकष तपासणी यंत्रणा स्थापन करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी मुख्य सचिवांना दिल्या. या शाळेची अलिकडेच तपासणी करुन त्रुटी असतानाही अनुकूल अहवाल देणाऱ्या अधिकाऱ्याला निलंबित करण्याचे आदेशही त्यांनी दिले.
याशिवाय आदिवासी मुलांसाठी राज्यभरात सुरु असलेल्या ५०० पेक्षा जास्त आश्रमशाळांचं त्रयस्थ संस्थेकडून लेखापरिक्षण करुन घेण्याचा निर्णयही राज्य सरकारनं घेतला आहे.