August 8, 2026 2:51 PM

printer

हिमाचल प्रदेशात बस अपघातात सात जण ठार, तर अकरा प्रवासी जखमी

हिमाचल प्रदेशातल्या चंबा जिल्ह्यात आज सकाळी झालेल्या रस्ते अपघातात एकूण सात जण ठार झाले तर अकरा प्रवासी जखमी झाले आहेत. एक खाजगी बस बैरागढ  इथून चंबाच्या दिशेनं जात असताना घाटात घसरुन पडली. अपघाताची माहिती मिळताच पोलीस पथक तातडीनं घटनास्थळी दाखल झालं असून मदत आणि बचावकार्य युद्धपातळीवर सुरु आहे. जखमींना  उपचारासाठी चंबा इथल्या पंडित जवाहरलाल नेहरू शासकीय रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. मृतांची ओळख पटवण्याचं काम अद्याप सुरु आहे. तसंच अपघाताचं कारण शोधण्याचा प्रयत्न सुरु असून विविध विभागांची पथकं घटनास्थळी तैनात करण्यात आली आहेत. 

           

या अपघाताबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. अपघातात मरण पावलेल्यांच्या कुटुंबांप्रती त्यांनी शोक संवेदना व्यक्त केल्या असून जखमींच्या तब्येतीत लवकर सुधारणा व्हावी, अशी सदिच्छा प्रधानमंत्र्यांनी समाज माध्यमांवर व्यक्त  केली आहे.

 

कर्नाटकात कोट्टीगेहराजवळ एलपीजी सिलेंडर्सनं भरलेल्या ट्रकची एका कारला धडक बसल्यानं झालेल्या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला तर दोन जण जखमी झाले . जखमींना स्थानिकांनी जवळच्या रुग्णालयात तातडीनं दाखल केलं असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचं वृत्त आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले असून या संदर्भात पुढील तपास सुरु असल्याचं स्थानिक पोलिसांनी सांगितलं. 

महाराष्ट्राच्या जालना जिल्ह्यात काल रात्री एक भरधाव कार विहिरीत कोसळून झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातल्या दोन महिलांचा मृत्यू झाला, तर कारमधले  अन्य दोनजण गंभीर जखमी झाले. कारला दुचाकीस्वारानं  धडक दिल्यानं चालकाचं  वाहनावरचं  नियंत्रण सुटलं  आणि कार रस्त्यालगतच्या विहिरीत कोसळली, अशी प्राथमिक माहिती मिळाली आहे. 

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.