August 11, 2026 10:31 AM

printer

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मुंबईत तिरंगा यात्रा

२०४७मध्ये विकसित भारताचं स्वप्न साकार करायचं असेल, तर छोट्या गोष्टींमध्ये, जाती-धर्माच्या भेदांमध्ये अडकून चालणार नाही, तर एकत्र चालायचा मंत्र अंगिकारायला हवा, असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी केलं आहे. वरळीत आज त्यांच्या उपस्थितीत तिरंगा यात्रा काढण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. ज्या तिरंग्यासाठी क्रांतिकारक फासावर गेले, सैनिकांनी सीमेवर मरण पत्करलं, भारतवासीयांनी मोठा संघर्ष केला, तो तिरंगा आकाशात चंद्र-सूर्य असेपर्यंत खाली उतरणार नाही, असं ते म्हणाले.

भारतानं वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये केलेल्या प्रगतीचा गौरवपूर्ण उल्लेख मुख्यमंत्र्यांनी केला. काही शक्ती देशाच्या अंतर्गत बाबींमध्ये लुडबूड करून भारताची घोडदौड रोखायचा प्रयत्न करत आहेत, मात्र त्यांना थोपवायची ताकद आजच्या भारतात आहे, अशी ग्वाही त्यांनी दिली. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष, मुंबई भाजपाचे अध्यक्ष अमित साटम, मंत्री मंगलप्रभात लोढा, आशीष शेलार, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, मुंबईच्या महापौर रितू तावडे यांच्यासह इतर यावेळी उपस्थित होते.

मुख्यमंत्र्यांनी आज नागपूरमध्ये तिरंगा वंदे मातरम प्रदर्शनाचं आणि नागपूर महानगरपालिकेच्या तिरंगा यात्रा स्टॉलचं उद्घाटन केलं. नागपूर जिल्ह्यातल्या अस्थिव्यंग आणि कर्णबधीर दिव्यांगांना फडनवीस यांच्या हस्ते मोफत जयपूर फुट आणि इतर साधनांचं वाटपही करण्यात आलं. 

सिंधुदुर्ग जिल्ह्यात सावंतवाडी इथं मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत आज तिरंगा यात्रा काढण्यात आली.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.