अन्नपदार्थांमध्ये भेसळ करणाऱ्यांवर ‘मकोका’ अर्थात संघटित गुन्हेगारी विरोधी कायद्याअंतर्गत अजामीनपात्र गुन्हे दाखल करावेत अशी सूचना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. विकसित महाराष्ट्र २०४७ अंतर्गत साल २०२६-२७ साठी निश्चित करण्यात आलेले टप्पे आणि कार्यवाहीसाठी आज मुंबईत झालेल्या एका बैठकीत ते बोलत होते. अन्नात भेसळ करणे हा साधा गुन्हा नसून तो थेट नागरिकांच्या जीवाशी खेळ आहे, अशा प्रकारचे कृत्य करणाऱ्या समाजकंटकांना कोणत्याही प्रकारची नरमाई दाखवू नये असं ते म्हणाले. या प्रकरणांमधील कायदेशीर प्रक्रिया अधिक बळकट करण्यासाठी ज्येष्ठ विधीतज्ज्ञांची मदत घेण्यात यावी आणि यासाठी तातडीने एक विशेष लीगल टीम तयार करण्यात यावी, असं शिंदे यांनी यावेळी सांगितले.
बैठकीला आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर, विधी आणि न्याय राज्यमंत्री आशिष जयस्वाल, अन्न आणि औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यासह संबंधित वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.