August 5, 2026 11:18 AM

printer

ब्रिक्स सांस्कृतिक प्रतिनिधींची बैठक भोपाळमध्ये होणार

ब्रिक्स देशांमधील सांस्कृतिक सहकार्य वाढवणं आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर एकमत साधणं या उद्देशानं सदस्य देशांच्या सांस्कृतिक प्रतिनिधींची आणि मंत्र्यांची एक बैठक आजपासून भोपाळ इथं आयोजित करण्यात आली आहे. भारताच्या अध्यक्षतेखाली आठ ऑगस्टपर्यंत ही बैठक होणार असल्याचं सांस्कृतिक मंत्रालयानं म्हटलं आहे. पहिल्या दोन दिवसात वरिष्ठ अधिकाऱ्यांची, तर पुढील दोन दिवसांत सांस्कृतिक मंत्र्यांची बैठक होणार आहे. या बैठकीत सर्जनशील अर्थव्यवस्था, सांस्कृतिक आणि सर्जनशील उद्योग, तसंच कॉपीराइट आणि कृत्रिम बुद्धिमत्ता, सांस्कृतिक वारशाचं जतन यासह संस्कृती, हवामान आणि शाश्वत विकास आदी मुद्द्यांवर चर्चा होणार आहे. आपल्या ब्रिक्स अध्यक्षपदाच्या कार्यकाळात सांस्कृतिक भागीदारी बळकट करणं आणि संस्कृतीच्या माध्यमातून सर्वसमावेशक, शाश्वत विकासाला चालना देणं या भारताच्या कटिबद्धतेचं प्रतिबिंब या बैठकीत उमटतं, असं सांस्कृतिक मंत्रालयानं नमूद केलं आहे.