पहिला ‘ग्लोबल साऊथ चित्रपट महोत्सव’ पुढच्या वर्षी भारतात होणार असल्याची घोषणा ब्रिक्स वेव्हज बझारच्या पार्श्वभूमीवर आयोजित वार्ताहर परिषदेत आज करण्यात आली. याशिवाय NFDC, NFAI इत्यादी संस्थांनी ब्राझील, रशिया, व्हिएतनाम इत्यादी क्षेत्रातल्या संस्थांशी चित्रपट आणि मनोरंजन क्षेत्रातलं सहकार्य वाढवण्यासाठी करार केल्याची तसंच चर्चा झाल्याची, चित्रपटांची सहनिर्मिती करण्यावर संमती झाल्याची आणि इरादापत्रांची देवाणघेवाण झाल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
काल मुंबईत सुरू झालेल्या दोन दिवसीय WAVES BRICS बझार उपक्रमाची आज संध्याकाळी सांगता होत आहे. या काळात ब्रिक्सच्या 20 सदस्य देशांनी, 900पेक्षा जास्त प्रतिनिधींनी या उपक्रमात भाग घेतल्याची माहिती राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश मगदुम यांनी दिली. या दीड दिवसांत जवळपास 250 बैठका झाल्याचंही त्यांनी सांगितलं. विविध देशांच्या सरकारी संस्था, मनोरंजन क्षेत्राशी संबंधित व्यक्ती, गुंतवणूकदार, creators यांच्यात विचारमंथन झाल्याचंही ते म्हणाले.