आज १४ ऑगस्ट. आजचा दिवस संपूर्ण देशात ‘फाळणी वेदना स्मृती दिन’ म्हणून पाळला जातो. आजच्या फाळणी वेदना स्मृती दिनानिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी फाळणीच्या काळात जीव गमावलेल्या नागरिकांच्या स्मृतीला आदरांजली वाहत त्यांच्या धैर्याचे स्मरण केलं.
आजच्या दिवशी देशाची फाळणी झाली. या फाळणीमुळे अनेकांची आयुष्य उद्धवस्त केली,अनेक कुटुंबे विस्थापित झाली, अनेकांनी त्यांचे आप्तेष्ट गमावले. असंख्य नागरिकांना मोठ्या यातना सहन कराव्या लागल्याचं प्रधानमंत्री मोदी यांनी समाज माध्यमावर लिहिलेल्या संदेशात म्हटलं आहे.
या संकटावर मात करत अनेकांनी शून्यातून पुन्हा आपलं जीवन उभे केले. प्रतिकूल परिस्थितीचे यशात रूपांतर करत त्यांनी देशाच्या प्रगतीत मोठे योगदान दिल्याचं प्रधानमंत्र्यांनी संदेशात नमूद केलं आहे. फाळणीच्या वेदना सोसलेल्या नागरिकांचा जीवनप्रवास मानवी जिद्द आणि सामर्थ्याची आठवण करून देतो.
संच हा दिवस देशातील सौहार्द आणि बंधुभाव जपण्याचा संकल्प अधिक दृढ करो आणि विकसित भारताच्या उभारणीसाठी सर्वांनी एकजुटीने कार्य करावे, अशी अपेक्षाही त्यांनी संदेशातून व्यक्त केली. फाळणीच्या काळात प्राण गमावलेल्या तसंच अत्याचारांविरोधात संघर्ष करणाऱ्यांना गृहमंत्री अमित शहा आणि संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी आदरांजली वाहिली.
१४ ऑगस्ट १९४७ हा इतिहासातील अत्यंत क्रूर अध्याय होता. या काळात लाखो नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले आणि अमानुष यातना सहन कराव्या लागल्या. कोट्यवधी नागरिकांना आपली घरे, संपत्ती आणि प्रियजन सोडून विस्थापित व्हावे लागले, असे शहा यांनी समाज माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे.
हा दिवस भारताच्या फाळणीच्या त्या शोकांतिकेची आठवण करून देतो. घरे, कुटुंबीय, संपत्ती गमावल्यानंतरही असंख्य नागरिकांनी पुन्हा आपले जीवन उभे करण्याचा निर्धार दाखवला. त्यांच्या संघर्ष, धैर्य, त्याग आणि जिद्दीचे स्मरण करण्याचा हा दिवस असल्याचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी समाज माध्यमावर लिहिलेल्या संदेशात म्हटलं आहे.