देशाच्या उत्तरभागात मोसमी पावसाचा जोर कायम असून विविध राज्यात मुसळधार पावसामुळे जनजीवन प्रभावित झालं आहे.
जम्मू काश्मीरमधे संततधार पावसामुळे जम्मू श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर दरडी कोसळण्याची शक्यता लक्षात घेऊन अमरनाथ यात्रा आज थांबवण्यात आली आहे.
हिमाचल प्रदेशात सर्वदूर पाऊस होत आहे. अनेक ठिकाणी वीज आणि पाणीपुरवठ्यावर परिणाम झाला आहे. राज्यातले १८५ रस्ते बंद पडले आहेत.
राजस्थानात जोरदार पाऊस होत असून नद्यांची पाणीपातळी वाढली आहे. अनेक ठिकाणी धरणांचे दरवाजे उघडले असून नदी काठच्या रहिवाशांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. अनेक जिल्ह्यांमधे आज शाळांना सुट्टी दिली आहे.
मध्यप्रदेशातल्या ३ जिल्ह्यांमधे नदी प्रवाहात वाढ झाली असून आसपासच्या गावांचा संपर्क तुटला आहे.
आसाममधे पूरस्थिती हळू हळू नियंत्रणात येत आहे. आतापर्यंत राज्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या दुर्घटनांमधे ९७ जणांचा मृत्यू झाला. ७३ निवारा शिबिरांमधे मदतकार्य चालू आहे.