झारखंडमध्ये कोडरमा जिल्ह्यात आज पहाटे भाविकांना घेऊन जाणाऱ्या बसची ट्रकला धडक बसल्यामुळे तिघांचा मृत्यू झाला तर १० जण जखमी झाले आहेत. मृत्युमुखी पडलेले तीनही जण नेपाळचे रहिवासी आहेत.
नेपाळच्या रौतहट जिल्ह्यातल्या ४५ भाविकांना घेऊन जाणारी ही बस देवघर जिल्ह्यात बाबा वैद्यनाथ धाम आणि दुमका इथल्या बासुकीनाथ धामला भेट दिल्यानंतर मायदेशी परतत होती.
वाटेत राजगीर मार्गावर असताना बस चालकाला डुलकी लागल्यानं ती महामार्गावर उभ्या असलेल्या ट्रकला मागून धडकली. मृतांमध्ये एका लहान मुलाचा समावेश आहे. जखमींना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.