August 5, 2026 11:35 AM

printer

पाकव्याप्त काश्मीरमधील दडपशाहीवर भारताचा पाकिस्तानला इशारा

भारतानं पाकव्याप्त जम्मू आणि काश्मीरमधील होणाऱ्या स्थानिक निवडणुका हा एक देखावा असून, अशा पोकळ उपक्रमांतून वास्तव लपवता येणार नाही, असं स्पष्ट केलं आहे. प्रत्यक्षात तिथं जनतेचं आंदोलन आणि पाकिस्तानी दलांकडून अनियंत्रित हत्या सुरू आहेत. या वर्षी जूनपासून सुरू असलेल्या दडपशाहीच्या कारवाईत किमान ९० नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे, असं परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी काल नवी दिल्लीत प्रसारमाध्यमांना माहिती देताना सांगितलं.

मानवी हक्कांबद्दल पाकिस्तान करत असलेल्या ढोंगी उपदेशाचं सत्य जगानं ओळखलं पाहिजे, असंही ते म्हणाले. दरम्यान, बांगलादेशचे पंतप्रधान तारिक रहमान यांना सप्टेंबरमध्ये दिल्लीत होणाऱ्या ब्रिक्स परिषदेच्या ‘आउटरीच’ सत्राला उपस्थित राहण्यासाठी भारतानं स्वतंत्रपणे निमंत्रण दिलं आहे, असंही यावेळी जयस्वाल यांनी सांगितलं.