डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

राज्यात सर्वत्र योग दिन मोठ्या उत्साहात साजरा

राज्यात आज सर्वत्र योग दिन मोठ्या उत्साहात  साजरा झाला.

योगाच्या अमूर्त ठेव्याचं रक्षण करणं आणि त्याचा प्रचार – प्रसार करणं हे प्रत्येक भारतीयाचं कर्तव्य आहे, असं प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी केलं. राजभवनमधे त्यांच्या उपस्थितीत योगसत्राचं आयोजन करण्यात आलं होतं, त्यावेळी ते बोलत होते. 

भारतीय जीवन शैलीची आयुर्वेद आणि योग  ही दोन विशेष अंगं आहेत, असं प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं. गेट वे ऑफ इंडिया इथं आयोजित योग दिवसाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस उपस्थित होते. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी उत्तर मुंबईत  चारकोप मार्केट इथं योगा ऑन स्ट्रीट आणि  इतर कार्यक्रमात सहभागी होत योगासनं केली. मुंबईचे माजी नगरपाल नाना चुडासामा यांच्या स्मृतीप्रित्यर्थ मरिन ड्राईव्ह इथं प्रिन्सेस स्ट्रीट उड्डाणपुलाखाली केलेल्या सुशोभीकरणाचं लोकार्पण आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांच्या हस्ते झालं. या पुलाखाली विविध प्रकारच्या योगमुद्रा कलाकृती साकारल्या आहेत. 

दक्षिण मध्य मुंबई वडाळा भारतीय जनता पार्टी विधानसभा यांच्यामार्फत आयोजित कार्यक्रमाला केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले मुख्य पाहुणे म्हणून उपस्थित होते. 

पुणे विमानतळ परिसरात आयोजित योग दिन कार्यक्रमाला केंद्रीय सहकार तथा नागरी हवाई वाहतूक राज्य मंत्री मुरलीधर मोहोळ उपस्थित होते. यावेळी त्यांनी विविध प्रकारची योगासनं केली.     

छत्रपती संभाजीनगरात केंद्रीय संचार ब्यूरो आणि भारत योग संस्थान, दिल्ली शाखा छत्रपती संभाजीनगर यांच्या वतीनं योग दिन  साजरा करण्यात आला. या विशेष प्रचार कार्यक्रमाच्या उद्धाटन प्रसंगी माजी केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ भागवत कराड आणि खासदार डॉ कल्याण काळे उपस्थित होते. नागपूरमधे केंद्रीय संचार ब्यूरो, वजह फाउंडेशन आणि एल. ए. डी. महाविद्यालय यांचा वतीनं जागतिक योग दिवसाचे आयोजन करण्यात आलं. इतर जिल्ह्यांमध्येही योग दिनामिमित्त योगाभ्यास आणि प्रात्यक्षिकं करण्यात आल्याचं आमच्या वार्ताहरांनी कळवलं आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा