आज जागतिक वन्यजीव दिवस आहे. पर्यावरण संतुलन, वन्यप्राण्याचं संरक्षण आणि संवर्धनासाठी प्रयत्न करण्याच्या उद्देशानं जागरुकता निर्माण करण्यासाठी आज विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज जागतिक वन्यजीव दिनानिमित्त गुजरातमधील जुनागड जिल्ह्यातील सासण गिर इथं राष्ट्रीय वन्यजीव मंडळ अर्थात NBWLच्या बैठकीत अध्यक्ष म्हणून उपस्थित राहणार आहेत. या बैठकीमध्ये लष्करप्रमुख, विविध राज्यांचे सदस्य, या क्षेत्रात काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी, मुख्य वन्यजीव वॉर्डन आणि विविध राज्यांचे सचिव अशा 47 सदस्यांचा समावेश आहे.
हे मंडळ पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली वन्यजीव आणि वनांचे संवर्धन आणि विकास करण्यासाठी काम करते. बैठकीनंतर, मोदी सासण इथल्या काही महिला वन कर्मचाऱ्यांशीही संवाद साधतील. आज सकाळी, पंतप्रधान गीर राष्ट्रीय उद्यानात सिंह सफारी करणार आहे. काल, त्यांनी जामनगरमधील वंतारा प्राणी संवर्धन केंद्राला भेट दिली. तसंच सोमनाथ मंदिरात जाऊन पुजाअर्चना केली. पंतप्रधानांनी काल सोमनाथ विश्वस्त मंडळाची बैठकही घेतली. ते शनिवारपासून 3 दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर आहेत.