जगभरात आज जागतिक रेडिओ दिवस साजरा केला जात आहे. दरवर्षी १३ फेब्रुवारी रोजी, रेडिओच्या महत्त्वाबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि रेडिओद्वारे माहिती मिळवण्याकरता लोकांना प्रोत्साहन देण्यासाठी, हा दिवस साजरा केला जातो. ‘रेडिओ आणि हवामान बदल’ ही यंदाच्या जागतिक रेडिओ दिनाची संकल्पना आहे.
रेडिओ म्हणजे संवादाचं टिकाऊ, बहुमुखी आणि सर्वत्र सहज उपलब्ध होणारं माध्यम असून त्याचं हे महत्त्व साजरं करण्याची संधी म्हणजे जागतिक रेडिओ दिन, असं युनेस्कोच्या महासंचालक ऑड्रे अझौले यांनी म्हटलं आहे.
बहुजन हिताय बहुजन सुखाय या ब्रीदवाक्यासह, जगातील सर्वात मोठं रेडिओ जाळं असलेलं आकाशवाणी हे देशातील सर्व लोकांपर्यंत पोहोचणारं माध्यम आहे. बातम्या आणि माहितीच्या प्रसाराद्वारे, राष्ट्राच्या सांस्कृतिक आणि आर्थिक विकासात रेडिओची महत्त्वाची भूमिका असल्याचं प्रसार भारतीचे अध्यक्ष नवनीत कुमार सहगल यांनी म्हटलं आहे.
भारताच्या समृद्ध संस्कृती आणि परंपरांचं वाहक असलेल्या आकाशवाणीनं लोकांना देशातील वैज्ञानिक प्रगतीच्या प्रवासाशीही जोडलं आहे. आकाशवाणीने स्पर्श केला नाही असा रोजच्या जीवनातला एकही पैलू नाही, असं प्रसारभारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव द्विवेदी यांनी म्हटलं आहे. तर नऊ दशकांपासून आकाशवाणी माहिती, शिक्षण आणि मनोरंजनासह श्रोत्यांपर्यंत पोहोचत आहे, असं आकाशवाणीच्या महासंचालक डॉ. प्रज्ञा पालीवाल गौर यांनी श्रोत्यांना दिलेल्या आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे.