आंतरराष्ट्रीय हॉकी संघटनेतर्फे ओमानमध्ये ४९वे एफआयएच पुरस्कार २०२४ जाहीर करण्यात आले. भारतीय हॉकी संघाचा कर्णधार हरमनप्रीत सिंगला वर्षातल्या सर्वोत्कृष्ट पुरुष खेळाडूचा पुरस्कार जाहीर करण्यात आला तर माजी खेळाडू पीआर श्रीजेशला वर्षातील सर्वोत्तम गोलरक्षक म्हणून गौरविण्यात आलं आहे. चीनच्या ये जियाओलाही वर्षातल्या सर्वोत्तम गोलरक्षकाचा आणि अर्जेंटिनाच्या जो डियाज आणि पाकिस्तानच्या सुफियान खान यांना एफआयएच रायझिंग स्टार्सचा पुरस्कार मिळाला.
चीन महिला संघाच्या मुख्य प्रशिक्षक एलिसन अन्नान यांना महिला विभागात वर्षातल्या सर्वोत्तम प्रशिक्षकाचा पुरस्कार तर पुरुष गटात जेरॉन डेल्मी यांना वर्षातल्या सर्वोत्तम प्रशिक्षक पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. स्कॉटलंडच्या सारा विल्सन आणि ऑस्ट्रेलियाच्या स्टीव्ह रॉजर्स यांनी अनुक्रमे महिला आणि पुरुष गटात वर्षातले सर्वोत्तम पंच पुरस्कार पटकावले. तज्ज्ञ पॅनेल, राष्ट्रीय हॉकी संघटना, चाहते आणि प्रसारमाध्यमे यांचा समावेश असलेल्या मतदान प्रक्रियेद्वारे विजेत्यांची निवड करण्यात आली.