सशक्त ग्राहक हा मजबूत अर्थव्यवस्थेचा पाया आहे. ग्राहकांच्या हक्कांचे रक्षण करणाऱ्या आणि सर्वांसाठी चांगले भविष्य घडवणाऱ्या शाश्वत जीवनशैलीसाठी आपण वचनबद्ध होऊ या, असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. आज जागतिक ग्राहक दिनानिमित्त त्यांनी जनतेला शुभेच्छा दिल्या. ग्राहक म्हणून आपण सदैव जागरूक आणि सतर्क राहणं गरजेचं असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. कोणतीही वस्तू खरेदी करताना वस्तूंचे दर, मुदत संपण्याची तारीख, वजन इत्यादी गोष्टी तपासून पाहणं आणि पावती घेणं आवश्यक असल्याचंही ते म्हणाले.
ग्राहकांना त्यांच्या हक्कांची जाणीव करुन देण्यासाठी तसंच त्यांची दिशाभूल होऊ नये म्हणून केंद्रसरकार वचनबद्ध असल्याचं ग्राहक व्यवहार मंत्री प्रल्हाद जोशी यांनी म्हटलं आहे, जागतिक ग्राहक हक्क दिनानिमित्त आयोजित एका वेबिनारला ते संबोधित करत होते. ग्राहकांचं केवळ संरक्षणच नव्हे तर ग्राहकांची समृद्धी हे देखील सरकारचं उद्दिष्ट आहे असं ते म्हणाले.
जागतिक ग्राहक हक्क दिनानिमित्त आज सर्वत्र विविध कार्यक्रम होत आहेत. ग्राहकांच्या हक्काचं रक्षण आणि इतर बाबींबद्दल जागरुकता निर्माण करण्याच्या उद्देशानं विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. ग्राहकांनी शाश्वत जीवनशैली स्वीकारून न्याय्य पध्दतीनं वाटचाल करण्याला प्रोत्साहन द्यावं, अशी आजच्या दिवसाची मध्यवर्ती संकल्पना आहे.