सिनेमा, आशय क्रांती, डिजिटल जग, माहिती तंत्रज्ञान उद्योग यांचं एकत्रीकरण वेव्ह अर्थात World Audio Visual and Entertainment Summit मधून प्रतिबिंबित होत असल्याचे गौरवोद्गार परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी काढले आहेत. वेव्हज परिषदेच्या पार्श्वभूमीवर आज नवी दिल्लीत विविध देशांचे राजदूत आणि उच्चायुक्तांसाठी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. जागतिक पातळीवर माध्यम आणि मनोरंजन उद्योगातल्या भारताच्या योगदानाचा आढावा त्यांनी घेतला.
देशाच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या नव्या पिढीच्या content creator साठी ही परिषद एक मोठं व्यासपीठ आहे. मोठ्या प्रमाणात आणि दर्जेदार आशयाची निर्मिती करणे यामुळं मदत होईल, असं माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले. देशातल्या अब्जावधी लोकांकडे फोन आहे आणि ६४ कोटी स्मार्टफोन देशात वापरले जातात. भारतात मोबाइल इंटरनेट अतिशय स्वस्त आहे. त्यामुळं नव्या पिढीच्या content creator साठी मोठा वाव असल्याचं त्यांनी सांगितलं.
विविध प्रकारच्या content creators साठी १ अब्ज डॉलरचा निधी उभारण्याची तसंच Indian Institute of Creative Technology ची पहिली शाखा मुंबईत सुरू करण्याची घोषणाही त्यांनी केली.
मुंबईत १ ते ४ मे दरम्यान ही परिषद होणार आहे. यासाठी माहिती प्रसारण मंत्रालय आणि राज्य सरकारमध्ये आज सामंजस्य करार करण्यात आला. ही परिषद राज्यासाठी गौरवास्पद असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
पारंपरिक माध्यमांचं नाविन्यपूर्ण माध्यमांशी एकत्रीकरण झाल्यामुळे स्पर्धा आणि सहकार्याची भावना निर्माण झाल्याची भावना माहिती आणि प्रसारण सचिव संजय जाजू यांनी यावेळी व्यक्त केली. या कार्यक्रमाचा उद्देश वेगाने वाढणाऱ्या माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रासाठी एक जागतिक व्यासपीठ बनवणं हा आहे.