१९ वर्षांखालील महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत सुपर सिक्स गटाच्या अंतिम सामन्यात भारताने स्कॉटलंडवर दीडशे धावांनी दणदणीत विजय मिळवला आहे. भारताच्या २०९ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना स्कॉटलंडचा संघ १४ षटकांत केवळ ५८ धावांवरच गडगडला. स्कॉटलंडची सुरुवात ही चाचपडत झाली. अवघ्या १३ धावांवर पिप्पा केली हिच्या रुपाने स्कॉटलंडला पहिला झटका बसला. त्यानंतर स्कॉटलंडच्या एकाही फलंदाजाला मोठी खेळी करण्यात यश आलं नाही. भारताच्या आयुषी शुक्लानं चार गडी बाद केले. तर वैष्णवी शर्मा आणि गोंगदी त्रिशा यांनी प्रत्येकी तीन गड्यांना तंबूचा रस्ता दाखवला.
त्याआधी भारताची सलामीवीर गोंगदी त्रिशाने नाबाद ११० धावा केल्या. अवघ्या ५९ चेंडूंमध्ये १३ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने तिनं ही कामगिरी केली. तर जी कमलीनी हिने अर्धशतक केलं.
दरम्यान, भारताने स्पर्धेच्या उपांत्य फेरीत याआधीच प्रवेश केला आहे. तर ब गटामध्ये दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड यांनी अंतिम चारमधे आपलं स्थान निश्चित केलं आहे.