महिला क्रिकेटमध्ये 19 वर्षांखालच्या टी ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेत, अंतिम सामन्यात भारतानं दक्षिण आफ्रिकेवर ९ गडी राखून दणदणीत विजय मिळवत, विश्वचषकावर आपलं नाव कोरलं. प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेचा संघ अवघ्या ८२ धावात गारद झाला.
भारताच्या गोंगदी त्रिशानं सर्वाधिक तीन गडी बाद केले. तर पारुनिका सिसोदिया,आयुषी शुक्ला आणि वैष्णवी शर्मा यांनी प्रत्येकी दोन आणि शबनम शकिल हिनं एक गडी बाद केला. विजयासाठी ८३ धावांचं लक्ष्या भारतानं एका गड्याच्या बदल्यात बाराव्या षटकातच पार केलं. गोंगदी त्रिशानं नाबाद ४४, तर सानिका चाळकेनं नाबाद २६ धावांची खेळी करत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. गोंगदी त्रिशा या सामन्यातली, तसंच स्पर्धेतली सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी भारताच्या विश्वचषक विजेत्या संघाचं अभिनंदन केलं आहे. हा विजय अनेक उदयोन्मुख खेळाडूंना प्रेरणा देणारा आहे. भारताच्या या नारीशक्तीचा आपल्याला अभिमान वाटतो, असं त्यांनी समाजमाध्यमावर म्हटलं आहे.