भारत आणि दक्षिण आफ्रिकेच्या महिला क्रिकेट संघांमध्ये सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवसअखेर दक्षिण आफ्रिकेनं पहिल्या डावात ४ बाद २३६ धावा केल्या आहेत. दक्षिण आफ्रिका अजूनही ३६७ धावांनी पिछाडीवर आहे.
त्याआधी आज सकाळच्या पहिल्या सत्रातच भारतानं आपला पहिला डाव कालच्या ४ बाद ५२५ धावांवरून पुढे सुरु केल्यानंतर विक्रमी ६ बाद ६०३ धावांवर घोषित केला. ही महिला कसोटी क्रिकेटमधील आजवरची सर्वोच्च सांघिक धावसंख्या असून, भारत महिला कसोटी क्रिकेटमध्ये ६०० धावांचा टप्पा गाठणारा पहिला संघ ठरला आहे. हा विक्रम रचताना भारतानं ऑस्ट्रेलियाच्या ९ बाद ५७५ या आजवरच्या सर्वोच्च सांघिक धावसंख्येला मागे टाकलं.
त्यानंतर पहिल्या डावात फलंदाजीसाठी आलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या वतीनं सुने लूस आणि मारीझेन्ने यांनी अर्धशतकी खेळी केल्या. भारताच्या वतीनं स्नेहा राणा हिनं ३ खेळाडूंना बाद केलं.