महिला क्रिकेटमधे, वडोदरा इथं आज झालेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारतानं वेस्ट इंडिजला २११ धावांनी पराभूत करत या मालिकेत दणदणीत विजयी सलामी दिली.
वेस्ट इंडिजनं नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केलं. भारतानं निर्धारित ५० षटकात, ९ गडी गमावून ३१४ धावा केल्या. स्मृती मंधनाचं शतक हुकलं. तिनं ९१ धावा केल्या. प्रतिका रावळ ४०, हार्लिंग देओल ४४, हरमनप्रीत कौर ३४, तर रिचा घोषनं १३ चेंडूत २६ धावांचं योगदान दिलं. वेस्ट इंडिजतर्फे जैदा जैम्सनं ५ बळी टिपले.
विजयासाठी ३१५ धावांचा पाठलाग करताना, वेस्ट इंडिजच्या फलंदाजीला रेणूका सिंगच्या गोलंदाजीनं सुरुवातीपासून रोखून धरलं. तिनं पहिल्याच चेंडूवर वेस्ट इंडिजच्या कर्णधार हेले मॅथ्यूजचा त्रिफळा उडवला. वेस्ट इंडिजतर्फे ॲफी फ्लेचरनं सर्वाधिक नाबाद २४ धावा केल्या. भारतातर्फे रेणुका सिंगनं ५, तर प्रिया मिश्रानं २, तर तितास साधू आणि दीप्ती शर्मानं प्रत्येकी १ बळी घेतला. भारतीय गोलंदाजांच्या भेदक माऱ्यामुळे वेस्ट इंडिजचा संघ २६ षटक आणि २ चेंडूत १०३ धावात गारद झाला.