महिला क्रिकेटमध्ये, आज पर्थ इथं झालेल्या तिसऱ्या आणि अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियानं भारतावर ८३ धावांनी विजय मिळवला. भारतानं नाणेफेक जिंकून यजमान ऑस्ट्रेलियाला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केलं. ऑस्ट्रेलियानं निर्धारित ५० षटकात ६ गडी गमावून २९८ धावा केल्या. एनाबेला सिदरलँडच्या ११० धावांच्या तडाखेबंद खेळीमुळे ऑस्ट्रेलियाला ही मजल गाठता आली. भारतातर्फे रेड्डीनं चार, तर दीप्ती शर्मानं एक बळी मिळवला.
विजयासाठी २९९ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताची सलामीच्या जोडीतली रिचा घोष ५ व्या षटकातच २ धावांवर बाद झाली. मात्र त्यानंतर आलेल्या हर्लीन देऊलच्या साथीनं स्मृती मंधनानं धावफलक हलता ठेवला. दुसऱ्या गड्यासाठी या दोघींनी ११८ धावांची भागीदारी केली. हर्निल ३९ धावा काढून बाद झाल्यानंतर मात्र, इतर खेळाडूंकडून फारशी साथ मिळाली नाही. स्मृतीनं १०५ धावा केल्या. कर्णधार हरमनप्रीत कौरच्या १२ आणि जेमिमा रोड्रिगेजच्या १६ धावा वगळता अन्य फलंदाजांना २ अंकी धावसंख्या करता आली नाही. दिप्ती शर्मा आणि साइमा ठाकूर शून्यावर बाद झाल्या. त्यामुळे ४५ षटकं आणि १ चेंडूत २१५ धावांवर भारताचा संघ गारद झाला. या दारुण पराभवामुळे भारतानं ही मालिका ३-० नं गमावली आहे.