धाराशिव इथं महाराष्ट्र जीवनोन्नती अभियान अर्थात उमेद अभियानाच्या महिलांनी उत्पादित केलेल्या महिला बचत गट उत्पादित वस्तूंच्या प्रदर्शनाचं उद्घाटन काल पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून झालं. महिला बचत गटाच्या माध्यमातून जिल्ह्यातल्या महिलांनी आपली प्रगती करून आत्मनिर्भर व्हावं, असं आवाहन पालकमंत्र्यांनी यावेळी केलं. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मैनाक घोष यावेळी उपस्थित होते. या प्रदर्शनाबद्दल माहिती देताना ते म्हणाले:
‘‘आमच्याकडे याठिकाणी आज दीडशे स्टॉल्स उपलब्ध आहेत. आणि फक्त धाराशिव जिल्ह्यातलं नाही तर बाहेरच्या जिल्ह्यातील पण जवळजवळ पंधरा स्टॉल्स येऊन याठिकाणी सहभागी झालेले आहेत. आमचं टार्गेट जवळपास वीस लाख आहे. पण आमची एक्सपेक्टेशन आहे की वीस लाखाच्या पलिकडे जाऊन जवळपास यावेळेस पंचवीस लाख या वेळेस आम्ही रीच करू.’’
यावेळी उमेद अभियानाच्या उपक्रमांना इलेक्ट्रॉनिक्स मीडियातून व्यापक प्रसिद्धी दिल्याबद्दलचा २०२०-२१ चा राजमाता जिजाऊ स्वावलंबन इलेक्ट्रॉनिक्स मीडिया उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार आकाशवाणी, दूरदर्शनचे वार्ताहर देविदास पाठक यांना प्रदान करण्यात आला. तसंच उत्कृष्ट काम करणाऱ्या महिला बचत गटांना देखील राजमाता जिजाऊ स्वावलंबन पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं.
Site Admin | February 7, 2025 11:32 AM | धाराशिव | प्रताप सरनाईक | महिला बचत गट
महिला बचत गटाच्या माध्यमातून महिलांनी आपली प्रगती करून आत्मनिर्भर व्हावं – प्रताप सरनाईक
