डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

आयर्लंडला पराभूत करत भारताचा ३-० असा मालिका विजय

महिला क्रिकेटमधे राजकोट इथं झालेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतानं आयर्लंडला ३०४ धावांनी पराभूत करत या मालिकेत ३-० असा निर्भेळ विजय मिळवला. भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना निर्धारित ५० षटकात ५ गड्यांच्या मोेबदल्यात ४३५ धावा केल्या. सलामीवीर प्रतिका रावल आणि स्मृती मंधाना या दोघींनी शतकं ठोकली. प्रतिकानं १५४, तर मंधानानं ८० चेंडूत १३५ धावा केल्या. या दोघींनी पहिल्या गड्यासाठी २३३ धावांची भागिदारी करत भारताच्या विजयाचा पाया रोवला. अवघ्या ७० चेंडूत स्मृतीनं आज आपलं शतक पूर्ण केलं. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात याआधी हरमनप्रीत कौरनं ८७ चेंडूत शतक झळकावलं होतं. तिचा विक्रम आज स्मृतीनं मोडला. त्यामुळे वेगवान शतक झळकावणाऱ्या भारतीय महिला फलंदाजांच्या यादीत ती आता अव्वलस्थानी पोहोचली आहे. ऋचा घोषनं ५९ धावांचं योगदान दिलं. 

 

विजयासाठी ४३६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना आयर्लंडचा संघ ३२ व्या षटकातच १३१ धावात गारद झाला. दिप्ती शर्मानं ३, तनूजा कंवरनं २, तर तितास साधू, सायली सातघरे, आणि मिन्नू मणी यांनी प्रत्येकी १ बळी मिळवला. 

 

प्रतिका रावल या सामन्यातली, तसंच मालिकेतलीही, सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरली.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा