डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

नागपूरमध्ये आजपासून राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन

राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन आजपासून नागपुरात सुरू होत आहे. या अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला काल सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांनी आणि त्याआधी विरोधी पक्षाच्या नेत्यांनी, पत्रकार परिषद घेऊन आपापली भूमिका स्पष्ट केली. अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या चहापानावर विरोधी पक्षानं बहिष्कार घातला.

 

नागपूरमध्ये होत असलेल्या या हिवाळी अधिवेशनात सर्व मुद्दयावर चर्चेसाठी आम्ही तयार आहोत, विरोधकांनी सभागृहात चर्चा करावी असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. नव्या मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी बोलताना ते म्हणाले.

 

मिशन समृद्ध महाराष्ट्र हा आमचा ध्यास आहे, असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले. निवडणुकीमध्ये महायुतीला घवघवीत यश मिळालं असून जनतेनं विरोधकांना त्यांची जागा दाखवून दिली आहे, मात्र तरीही सुदृढ लोकशाहीसाठी आम्ही विरोधकांच्या मताचा आदर करू, असं शिंदे म्हणाले. दोन ते तीन दिवसात मंत्रिमंडळाचं खातेवाटप होईल अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी दिली.

 

तत्पूर्वी विधान परिषदेतले विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, काँग्रेसचे नाना पटोले, विजय वडेट्टीवार, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जितेंद्र आव्हाड आदी नेत्यांनी पत्रकार परिषद घेतली. महायुती सरकारमधल्या घटक पक्षांनी निवडणुकीच्या काळामध्ये ,शेतकरी आणि महिलांना दिलेली आश्वासनं तातडीनं पूर्ण करावीत, अधिवेशनाचा कालावधी वाढवावा, आणि परंपरा लक्षात घेता आघाडीच्या नेत्याला विरोधी पक्ष नेतेपद द्यावं, अशा मागण्या या नेत्यांनी केल्या. परभणीची घटना आणि बीडमध्ये सरपंचाची झालेली हत्या गृह खात्याच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे, अशी टीका या नेत्यांनी केली. या सगळ्या प्रकाराची उच्च न्यायालयाच्या विद्यमान न्यायाधिशांमार्फत तसंच सीबीआय मार्फत चौकशी करावी, अशी मागणी नाना पटोले यांनी यावेळी केली.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा