संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशीही कामकाजाचा शेवट निदर्शनं आणि गोंधळातच झाला. या अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासूनच विरोधकांनी अदानी मुद्द्यावरुन तर सत्ताधाऱ्यांनी काँग्रेसचे अमेरिकन अब्जाधीश जॉर्ज सोरोस यांच्याशी असलेल्या कथित संबंधावरुन आरोप प्रत्यारोप केले. केंद्रिय मंत्री अमित शहा यांच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयीच्या कथित वक्तव्यावरुनही विरोधकांनी गोंधळ घातला. त्यामुळे दोन्ही सभागृहांचं कामकाज वारंवार स्थगित करावं लागलं. राज्यसभेत अध्यक्ष जगदीप धनखड यांच्यावरच्या अविश्वास प्रस्तावावरुन कामकाजात व्यत्यय आला. या अधिवेशनात लोकसभेत चार तर राज्यसभेत तीन विधेयकं मंजूर झाली. तसंच राज्यघटनेच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त राज्यघटनेबाबतही चर्चा झाली.
दरम्यान, बांग्लादेशमध्ये हिंदू आणि अन्य अल्पसंख्याक नागरिकांशी संबंधित हिंसाचाराच्या घटनांबद्दल बांग्लादेश सरकारसोबत चर्चा केल्याची माहिती सरकारनं काल लोकसभेत दिली. बांग्लादेश सरकार अल्पसंख्याकांच्या सुरक्षिततेसाठी योग्य ती कारवाई करेल अशी अपेक्षा असल्याचं परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री कीर्ती वर्धन सिंग यांनी लोकसभेत लेखी उत्तरात सांगितलं. गेल्या 9 डिसेंबरला बांग्लादेश दौऱ्यावर गेलेल्या परराष्ट्र सचिवांनी भारताची भूमिका बांग्लादेश सरकारला कळवल्याचं त्यांनी सांगितलं.