केंद्र सरकारनं आज ८७ हजार ७६२ कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या लोकसभेत मांडल्या. त्यातल्या ४४ हजार कोटी रुपयांहून अधिक रकमेच्या मागण्या कर्जाचा परतावा, व्याज वगैरेसाठी आहे.
चर्चेला सुरुवात करताना काँग्रेस नेते के. सी. वेणुगोपाल यांनी गेल्या काही वर्षात माहिती तंत्रज्ञान, दळणवळण, रिटेल, ग्राहकोपयोगी वस्तू आणि बँकिंग क्षेत्रात गेल्या काही वर्षात वेतनवाढ झाली नसल्याचा दावा केला.
भाजपाचे खासदार डॉ. संजय जयस्वाल यांनी पुरवणी मागण्यांमध्ये शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारनं २५ हजार कोटी रुपये मागितल्याचा मुद्दा उपस्थित केला. चालू आर्थिक वर्षात शेतकऱ्यांना सुमारे साडे ४ लाख कोटी रुपये अनुदानाच्या माध्यमातून दिले जात असल्याचं ते म्हणाले.
तृणमूल काँग्रेसचे खासदार सौगाता राय यांनी आर्थिक संकट आणि घसरलेल्या आर्थिक वृद्धी दराकडे लक्ष वेधलं. परदेशातून कर्ज घेण्याचं प्रमाण वाढल्याचं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या. निर्यात कमी होऊन आयात वाढल्याचं त्यांनी सांगितलं.