राज्यसभेत आजही अध्यक्ष जगदीप धनखड यांच्यावरच्या अविश्वास ठरावाच्या मुद्द्यावरून विरोधकांनी प्रचंड गदारोळ केला. काँग्रेसप्रणित विरोधी पक्षांनी हा अविश्वास ठराव आणला असून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये यावरून आजही खडाजंगी झाली. गेल्या तीस वर्षात आणि आपल्या कार्यकाळात राज्यसभेच्या अध्यक्षांच्याविरोधात अशा किती नोटीस आल्या आहेत ते सभागृहासमोर यावं असं धनखड म्हणाले. विरोधी सदस्यांच्या वर्तनावर आणि त्यानी सभागृहाबाहेर केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यावर त्यांनी नाराजी व्यक्त केली. विरोधकांना त्यांच्याविरोधात प्रस्ताव आणण्याचा अधिकार आहे मात्र त्यांनी संविधानाचं उल्लंघन केलं आहे असं ते म्हणाले.
विरोधकांचा ठराव १४ दिवसांनी घेतला जाईल, विरोधक वेळोवेळी घटनात्मक कामकाजाला टाळून अध्यक्षांच्या विरोधात मोहीम राबवत आहेत, अशी टीका त्यांनी केली. आपण नेहमीच विरोधकांप्रती आदरभावना दाखवली आहे, विरोधी पक्ष नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी आपल्याशी चर्चा करावी, असं त्यांनी सांगितलं. मात्र तरीही गोंधळ सुरूच राहिल्यानं सभागृहाचं कामकाज सोमवार सकाळपर्यंत स्थगित करण्यात आलं.