राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या आजच्या दुसऱ्या दिवशी विधानसभेत तालिका सदस्य म्हणून विजय रहांगडाले, रमेश बोरनारे, शेखर निकम आणि दिलीप सोपल यांची नियुक्ती केल्याचं अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी जाहीर केलं. सभागृहाचे माजी सदस्य आणि माजी मंत्री दत्तात्रय राणे यांच्या निधनाबद्दल शोकप्रस्ताव अध्यक्षांनी मांडला आणि तो मंजूर झाला. तत्पूर्वी, कामकाज सुरू होण्याआधी विरोधकांनी परभणी आणि बीड इथल्या घटनांच्या निषेधार्थ विधानभवनाच्या पायऱ्यांवर सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली. विधानसभेतही विरोधक या मुद्द्यावरून आक्रमक झाले आणि स्थगन प्रस्ताव आणून या विषयावर आजच चर्चा करण्याची मागणी केली. अध्यक्षांनी ही मागणी फेटाळली आणि उद्या चर्चा घेणार असल्याचं सांगितलं. त्यामुळे विरोधकांनी सभात्याग केला. त्यानंतर औचित्याचे मुद्दे चर्चेसाठी घेण्यात आले. त्यानंतर नुकत्याच मुंबईत झालेल्या तीन दिवसीय विशेष अधिवेशनात राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी केलेल्या अभिभाषणाबद्दल त्यांचे आभार मानणारा प्रस्ताव भाजपचे पराग अळवणी यांनी मांडला. यावर सध्या विधानसभेत चर्चा सुरू आहे.
Site Admin | December 17, 2024 1:50 PM | Maharashtra Legislature | Winter session 2024