राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून नागपुरात सुरुवात झाली. कामकाज सुरू होण्याआधी विरोधकांनी ईव्हीएम हटवा, लोकशाही वाचवा अशी घोषणाबाजी करत विधिमंडळ सदनाच्या पायऱ्यांवर आंदोलन केलं. कामकाजाच्या सुरुवातीला मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी मंत्र्यांचा परिचय सभागृहाला करुन दिला. त्यानंतर मंत्री उदय सामंत यांनी दोन्ही सभागृहात ३५ हजार ७८८ कोटी ४० लाख रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर केल्या.
पुरवणी मागण्यांमध्ये ३ हजार ५० कोटी रुपये मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजना, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी पंधराशे कोटी, मोदी आवास घरकुल योजनेसाठी साडे बाराशे कोटी रुपये, सहकारी साखर कारखान्यांना कर्जाकरता सुमारे बाराशे कोटी रुपये यासारखे खर्च प्रस्तावित आहेत. सर्वाधिक सुमारे साडे ७ हजार कोटी रुपये सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले जाणार आहेत.
काँग्रेस नेते नाना पटोले यांनी परभणी, बीडमधल्या हिंसाचाराच्या घटनांबद्दल स्थगन प्रस्ताव मांडण्याचा प्रयत्न केला. आज शोक प्रस्ताव असल्यानं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी हे तो फेटाळला. या दोन्ही घटना गंभीर असून याचं राजकारण न करता विरोधकांनी विधायक सूचना कराव्यात अशी अपेक्षा मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केली. त्यानंतर मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानसभेच्या पटलावर आठ विधेयकं सादर केली.
यानंतर विधानसभा अध्यक्षांनी माजी राज्यपाल एस एम कृष्णा आणि विधानसभा सदस्य दिनकरराव जाधव यांच्या निधनाबद्दल शोक प्रस्ताव मांडले आणि सभागृहात ते स्वीकृत केले. त्यानंतर विधानसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालं.