अदानी लाचखोरी प्रकरणासह विविध मुद्द्यांवरून आजही संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालं. लोकसभेत काँग्रेस, द्रमुकसह अन्य विरोधी पक्ष सदस्यांनी अदानी लाचखोरी प्रकरणात घोषणाबाजी केली. या दरम्यान, रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी रेल्वे सुधारणा विधेयक २०२४ वरच्या चर्चेला उत्तर देण्याचा प्रयत्न केला. सभापती ओम बिर्ला यांनी विरोधकांना कामकाज सुरू ठेवण्याची विनंती केली. मात्र तरीही गोंधळ सुरूच राहिल्याने लोकसभेचं कामकाज आधी तीन वेळा आणि नंतर दिवसभरासाठी तहकूब झालं.
राज्यसभेत भाजपा नेते जे. पी. नड्डा यांनी काँग्रेसवर राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात आणल्याचा आणि देशात अस्थिरता असल्याची अफवा पसरवल्याचा आरोप केला. काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांचे अमेरिकेतल्या जॉर्ज सोरोस फाऊंडेशनशी संबंध असल्याचा आरोपही त्यांनी केला. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी या आरोपांचं खंडन केलं आणि भाजपा देशद्रोही असल्याचा प्रत्यारोप केला. त्यामुळे गदारोळ झाल्यानं राज्यसभेचं कामकाजही दिवसभरासाठी तहकूब झालं.