विदर्भ, मराठवाड्याच्या जनतेला न्याय देण्यासाठी हिवाळी अधिवेशनात चर्चा होणं अपेक्षित होतं पण अशी कोणतीच चर्चा झाली नाही. मविआ सरकार असताना याच अधिवेशनात शेतकरी कर्जमाफीची घोषणा केली होती पण भाजपा युती सरकारने शेतकरी कर्जमाफीचे आश्वासन देऊनही कर्जमाफीची घोषणा केली नाही, अशी टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली. अधिवेशन संस्थगित झाल्यानंतर महाविकास आघाडीनं घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. अधिवेशनातून सरकारनं जनतेच्या तोंडाला पानं पुसली, असा आरोप पटोले यांनी केला.
सरकारने अधिवेशनात मागील काळातीलच काही योजना सांगितल्या, विदर्भाच्या वाट्याला काहीही मिळाले नाही. ईव्हीएम सरकारने जनतेला न्याय दिला नाही, पुरवणी मागण्या फक्त खर्चासाठी आहेत, विकासासाठी निधीची तरतूद नाही, असा टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली.
पोलीस आणि बीडच्या गुंडाला सरकारचे अभय असल्याचे सांगत या बीड आणि परभणी दोन्ही प्रकरणांत सरकारने बोटचेपी भूमिका घेतल्याचा आरोप महाविकास आघाडीनं केला. दरम्यान, काँग्रेस नेते राहुल गांधी सोमवारी परभणी दौऱ्यावर असून सोमनाथ सुर्यवंशी यांच्या कुटुंबियाची भेट घेणार असल्याची माहिती पटोले यांनी दिली.