विम्बल्डन टेनिस अजिंक्यपद स्पर्धेच्या पुरुष एकेरीत आजचा अंतिम सामना जागतिक क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर असलेला नोव्हाक जोकोविच आणि विद्यमान विजेता, स्पेनचा कार्लोस अल्कराज यांच्यात होणार आहे. संध्याकाळी साडेसहा वाजता हा सामना सुरू होईल.
अल्कराजचा हा विम्बल्डनचा दुसरा अंतिम सामना आहे, तर जोकोविचनं सात वेळा या स्पर्धेचं अजिंक्यपद पटकावलं आहे. आठवेळा विम्बल्डनच्या जेतेपदावर नाव कोरणाऱ्या रॉजर फेडररच्या विक्रमाशी बरोबरी साधण्याचं ध्येय जोकोविचसमोर आज आहे. तर मिश्र दुहेरीत सातव्या मानांकित यान जेलिन्की आणि सू वे शे यांच्यासमोर सँतियागो गोन्झालेस आणि जुलियाना ओलमोस यांचं आव्हान असेल.
दरम्यान, महिला एकेरीच्या काल झालेल्या अंतिम सामन्यात झेक प्रजासत्ताकच्या बार्बोरा क्रेजीकोव्हा हिनं अटीतटीच्या सामन्यात इटलीच्या जॅस्मिन पाओलीनी हिच्यावर ६-२, २-६, ६-४ अशी मात करून पहिल्यावहिल्या विम्बल्डन जेतेपदावर नाव कोरलं.