स्वच्छ भारत अभियानाला दहा वर्ष पूर्ण झाल्याबद्दल विविध जागतिक नेते आणि संघटनांनी प्रशंसा केली आहे. स्वच्छ भारत अभियान या परिवर्तनशील उपक्रमाच्या माध्यमातून शाश्वत विकासाची उद्दिष्टे गाठण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आणि केंद्र सरकारनं उचलेल्या महत्त्वाच्या पावलांबद्दल जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक टेड्रॉस अधानॉम घेब्रेयेसुसन यांनी आज गौरवोद्गार काढले. अधिक स्वच्छ आणि निरोगी देशाला चालना देण्यासाठी या मोहिमेनं जनतेला उद्युक्त केलं असं ते म्हणाले.
शौचालयांच्या उपलब्धतेबाबत सुधारणा झाल्यामुळे स्वच्छता अभियानानं भारतात लक्षणीय बदल घडवून आणला असल्याचं जागतिक बँकेचे अध्यक्ष अजय बंगा यांनी म्हटलं आहे.
आशियाई विकास बँकेचे अध्यक्ष मत्साद आसाकावा यांनी म्हटलंय की या द्रष्ट्या योजनेच्या अगदी प्रारंभापासून भारताशी आपली भागीदारी असल्याचा बँकेला अभिमान वाटतो.
टाटा ट्रस्टचे अध्यक्ष रतन टाटा आणि मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स यांनीही मोदी यांचं अभिनंदन केलं आहे. शौचालय आणि आरोग्यावर स्वच्छ भारत अभियानाचा झालेला परिणाम विलक्षण असल्याचं बिल गेट्स यांनी म्हटलं आहे.